हद्दवाढ न होणे हे ‘दक्षिण’च्या तत्कालीन आमदारांचे अपयश : संदीप देसाई

0
168

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नुकतेच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी शहराच्या दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा, अशा सूचना केल्या. अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदने सादर केली. परंतु संबंधित प्रस्ताव मे अखेरपर्यंत राज्य शासनाला पाठवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढीच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली असताना ती यशस्वीपणे पुढे जावी यासाठी सर्व संबंधितांचा संवाद गरजेचा आहे. मात्र, हद्दवाढ न होणे हे ‘दक्षिण’च्या तत्कालीन आमदारांचे अपयश असल्याची टीका ‘आप’ नेते संदीप देसाई यांनी केली.

संदीप देसाई यांनी म्हणाले की, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे, ती करत असताना आजूबाजूच्या गावांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. महापालिकेने सर्वात प्रथम संबंधित गावांना त्यांच्या विकासासाठी आपल्याकडे असलेला आराखडा सादर करावा जेणेकरून त्यांचा विश्वास संपादित करणे सोपे होईल. त्याचबरोबर संबंधित गावांमधून होणाऱ्या राजकीय विरोधाला जिल्ह्याच्या नेत्यांनी तसेच कोल्हापूर दक्षिणच्या आमदारांनी पुढाकार घेऊन मिटवावे लागेल. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ना. सतेज पाटील, अमल महाडिक यांनी केले आहे. ते प्रतिनिधित्व करत असताना हद्दवाढीचे प्रस्ताव त्या-त्या वेळी पाठवण्यात आले आहेत. आणि त्यांच्याच पक्षाची म्हणजे काँग्रेस व नंतर भाजपची सत्ता राज्यात असताना हा प्रस्ताव पुढे सरकला नाही ही वस्तुस्थिती आहे. हद्दवाढीमध्ये प्रस्तावित बहुतांश गावे करवीर तालुक्यातील याच मतदारसंघातील आहेत. हद्दवाढ न होणे हे तर ‘दक्षिण’च्या तत्कालीन आमदारांचे अपयश आहे. आ. ऋतुराज पाटील व पालकमंत्री मा. सतेज पाटील यांनी पुढाकार घेतल्यास गावांच्या ‘हटवादास’ विराम मिळून ‘हद्दवाढ’ होणे शक्य आहे.