कोल्हापूर (प्रतिनिधी) : दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथे दूषित पाण्यामुळे अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावातील ६० बाधित रुग्णावर सीपीआरसह अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज आमदार ऋतुराज पाटील यांनी सीपीआर येथे भेट देऊन गॅस्ट्रोबाधित रुग्णांची विचारपूस केली.

गेल्या आठवडाभरापासून आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविकांंमार्फत चालू असलेल्या सर्वेक्षणामध्ये गावात गॅस्ट्रोची लागण झाली असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे गावातील अनेक रुग्णावर सीपीआरसह अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी सीपीआर येथे गॅस्ट्रो बाधित रुग्णाची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली. रुग्णांंच्या नातेवाइकांना भेटून रुग्णाच्या प्रकृती विषयक चौकशी केली. रुग्णांंवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरना दिल्या.

गावातील पाणीपुरवठा संदर्भात आणि आरोग्य तपासणीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत गावात आरोग्य पथके नेमून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या आणि ग्रामपंचायत प्रशासनालाही गावात साथ आटोक्यात येईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या आहेत.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. विजय बर्गे यांच्यासह दऱ्याचे वडगाव सरपंच अनिल मुळीक आणि रुग्णांंचे नातेवाईक आदी उपस्थित होते.