निगवे खालसा येथे ट्रॅक्टरखाली सापडून युवकाचा मृत्यू

0
477

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : निगवे (खालसा) ता. करवीर येथील महाविद्यालयीन तरुणाचा ट्रॅक्टरखाली सापडून जागीच मृत्यू झाला. कृणाल बबन शिंदे (वय १६) असे त्याचे नाव असून हा दुर्दैवी प्रकार आज (शुक्रवार) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान घडला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की, निगवे येथील नावेची पाणंद या रस्त्यावरील अशोक पाटील यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर – ट्रेलरने मुरूमचा भराव करण्याचे काम सुरू होते. ट्रॅक्टर मालक मित्र असणाऱ्या संदीप शिवाजी पाटील यांच्यासोबत कृणाल गेला होता. दुपारी अडीचच्या दरम्यान वेळे असल्यामुळे संदीप ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला चावीसह लावून जेवण करत होता. त्या वेळेत मयत कृणाल हा संदिप यांच्या ट्रॅक्टरवर बसला व  त्याने ट्रॅक्टर सुरू केला. मात्र, गिअरमध्ये असणाऱ्या ट्रॅक्टरने वेग घेतला. त्यामुळे गडबडून जाऊन ट्रॅक्टरवरून उडी मारताना कृणालचा पाय क्लचमध्ये अडकला व तो मागील चाकाखाली सापडला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

कृणाल हा बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयात अकरावीत शिक्षक होता. शांत व मनमिळाऊ स्वभाव असणाऱ्या कृणाल याच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई – वडील, लहान भाऊ व आजी, आजोबा असा परिवार आहे.