सानेगुरुजी वसाहतीतील तरूणाचा नदीत बुडून मृत्यू

0
84

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्रांसोबत पोहताना हणमंतवाडी येथील घाटावर एक तरूण बुडला. त्याला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये नेले असता  त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. अथर्व विजय गायकवाड (वय २१, रा. सानेगुरुजी वसाहत) असे मृत तरुणाचे नांव आहे. या प्रकरणाची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अथर्व गायकवाड एमआयडीसीमध्ये नोकरी करत होता. तो काही मित्रांसोबत हणमंतवाडी घाटावर जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर सर्वजण पोहायला नदीत उतरले. त्यानंतर काही अंतर पोहत गेल्यानंतर अथर्व पाण्यात बुडू लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला मित्रांनी पाण्याबाहेर काढून सीपीआरमध्ये नेले.  मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  अथर्वचे वडील रिक्षा चालवतात. तर आई गृहिणी आहे. विवाहित दोन बहिणी असून तो एकूलता एक होता.