कोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणास आज (शुक्रवार) जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हणमंत भिमसी धोत्रे (वय ३१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, नागाव, ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार चार वर्षांपूर्वी घडला होता.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ जुर्ले २०१७ रोजी पिडीत मुलगी तिच्या राहत्या घरात मैत्रिणी सोबत असताना आरोपी धोत्रे याने घरात घुसून घुसून आतील लाईट व फॅन बंद केला. पीडित मुलीचा हात पकडून तिला एक खोलीत ओढून नेत असताना मुलीने शेजारी टेबलावरील कुलूप त्याच्या डोक्यात मारले. त्यास घराबाहेर ढकलून बाहेरून कुलूप लावून मैत्रीण सोबत पिडीत मुलगी आईला बोलण्याकरीता आजी-आजोबांच्या घराकडे गेली. त्यावेळी यातील आरोपीने जा तुझ्या आईला बोलावून आण म्हणत शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर आई घरी आल्यानंतर तिला मारहाण केली.

पीडित मुलीने आरोपीविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस. महात्मे यांच्या कोर्टात चालला. सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद आणि केलेल्या तक्रारी ग्राह्य धरुन न्यायमूर्तींनी आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी आणि १६ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. यातील १६ हजार रुपये पीडितेला देण्याच्या सूचना कोर्टाने केल्या आहेत. तपासी अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक एम. टी. गभाले यांनी काम पाहिले.