राधानगरी (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील या विजयात राधानगरी तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल, पण कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून या निवडणुकीतून जातीयवादी पक्षाला हद्दपार करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ते आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

या वेळी पाटील म्हणाले की, मागील सहा वर्षांपूर्वी आमच्या गाफीलपणामुळे भाजपचा विजय झाला पण निवडून आलेल्यानी सहा वर्षांत किती पदवीधरांचा प्रश्न सोडवला, हे त्यांनाच माहीत.  प्रश्न सोडवला हे त्यांनाच माहीत. आमचे उमेदवार शिक्षकांचे आणि पदवीधरांचे प्रश्न नक्कीच सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राधानगरी तालुक्यातील भाजप वगळून काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर प्रथमच आले. हा धागा पकडत ए. वाय. पाटील यांनी आता आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढू, असे म्हणताच नेते व कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर करत त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

या वेळी हिंदुराव चौगले, कृष्णराव किरुळकर, अरुण जाधव, विजयसिंह मोरे, किसन चौगले यांची भाषणे झाली. या वेळी ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, ए. डी. पाटील-गुडाळकर, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, युवराज वारके, सदाशिवराव चरापले, विश्वनाथ पाटील, संजयसिंह पाटील आदी उपस्थित होते.