रशिवडे (प्रतिनिधी) : धामोड-कोते- माणेवाडी रस्त्यावरून खैर लाकडाची बिगरपास वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. ही कारवाई कोते पैकी माणेवाडी येथे आज (शुक्रवारी) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. राशिवडे वनरक्षक उमा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी वाहन मालक लहू रामचंद्र माने (रा.कोते पैकी माणेवाडी) आणि लाकूड मालक रामचंद्र साईल (रा.एनारी ता. वैभववाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.    

अधिक माहिती अशी की, धामोड-कोते- माणेवाडी रस्त्यावर गस्त घालत असता कोते पैकी माणेवाडी येथे महिंद्रा मार्शल गाडी नं (MH13N0017) खैर लाकडाची बिगरपास वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. या वाहनाची झडती घेऊन खैर लाकडासह वाहन जप्त करण्यात आले.

ही कारवाई वनपाल आर. एस. तिवडे, वनरक्षक दिनेश टिपूगडे, शिवाजी कांबळे, जोतिराम कवडे, संतोष करपे, उमा जाधव यांनी केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल एस. बी. बिरासदर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.