कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात गेले अनेक दिवस पडणारा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबर्डे (ता. पन्हाळा) येथील संभाजी नानू पाटील यांच्या घरावर झाड व बांबूचे बेट पडले. त्यांच्या घरावरील पत्र्यासह भिंती ढासळल्यामुळे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाटील यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  

संभाजी पाटील हे पत्नी व मुलासह घरात होते. झाड पडल्याने जनावरांचा गोठाही उद्ध्वस्त झाला असून, ऐन पावसाळ्यात ओढवलेल्या या आपत्तीमुळे पाटील कुटुंबीयांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततचा पाऊस व पुरामुळे हा भाग पूर्णत: बंद झाला आहे. पोलीस पाटील रामदास पाटील व सरपंच आक्काताई पाटील, सदस्य आनंदा कांबळे, सदाशिव गुरव, विलास पाटील, विष्णू पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व वरिष्ठ कार्यालयाकडे घडलेल्या घटनेचा अहवाल सादर केला.