कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे कोल्हापुरातील फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचा व्यवसाय पूर्ववत सुरू राहण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी फेरीवाले संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी केली आहे.

कोल्हापूर शहरात सुमारे १० ते १५ हजार फेरीवाले असून गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे त्यांचे व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. त्यातून मार्ग काढत गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर पंतप्रधान सहयोग निधीच्या माध्यमातून फेरीवाल्यांनी १० हजाराचे कर्ज काढून आपला व्यवसाय सावरत कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहेत.

दरम्यान, पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असून राज्य सरकारने यामध्ये शिथिलता आणून फेरीवाल्यांचे व्यवसाय पूर्ववत करावेत, अशी मागणी फेरीवाले संघटनेच्या वतीने कांबळे यांनी केली आहे.