कळे (प्रतिनिधी) : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे बिद्र लक्षात ठेऊन सदृढ बालकासाठी शासनाने राबविलेल्या सेवा पंधरवडयाचा महिलांनी लाभ घ्यावा. मातांनी स्वतःच्या आरोग्या इतकीच उदरातील बाळाची काळजी घ्यावी. कारण सदृढ बालक हीच देशाची संपत्ती आहे, असे प्रतिपादन सरपंच भाग्यश्री बच्चे यांनी केले.

पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथे जि. प. च्या आरोग्य विभागांतर्गत आयोजित माता सुरक्षित तर घर सुरक्षित व ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाग्यश्री बच्चे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पं.स.चे माजी सदस्य व पन्हाळा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विलास पाटील हे होते.

शिबिरात गरोदर मातांची रक्त तपासणी व आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. शिबिराचा सावर्डे, मल्हारपेठ, मोरेवाडी, जाधववाडी येथील सुमारे ६० नागरिकांनी लाभ घेतला.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत झालेल्या या शिबिरात प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्यानंद शिरोलीकर यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी रोहन भावके, पूजा घाळके, जे. एस. भास्कर, एम. एस. गुळवणी, सुपरवायझर जमादार, आरोग्य सेविका स्वप्नाली थोरात, मारूती पाटील, आशा गटप्रर्वतक दीपाली पाटील, स्वयंसेविका संगीता पाटील, राणी साठे, जयश्री कापडे, बोरगे आदी उपस्थित होते.