माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक घेणार : ना. हसन मुश्रीफ

0
97

कागल (प्रतिनिधी) : लष्करातून सेवानिवृत्त होऊन सरकारच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामविकास मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बैठक घेऊन, या संघटनेचे प्रश्न मार्गी लावू असे ना. मुश्रीफ यांनी सांगितले.यावेळी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलच्या शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले की, भारतमातेच्या संरक्षणार्थ प्राणांची बाजी लावून सैनिक आपली सेवा बजावत असतात. सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते महाराष्ट्र सरकारच्या सेवेत पुन्हा दाखल होत असतात. अशा पुनर्नियुक्त माजी सैनिकांना त्यांच्या स्थानिक जिल्ह्यातच नियुक्ती मिळून त्यांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाजीराव देशमुख यांनी, सैनिकांनी  भारताच्या संरक्षणासाठी या सैनिकांनी वीस वर्षे कुटुंबापासून दुर राहून खर्ची घातली आहेत. त्यांना पुनर्नियुक्त सेवेत असतानाही त्यांच्या वाट्याला हीच वेळ येते, असे प्रतिपादन केले.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष  बाजीराव देशमुख, समन्वयक दिलावर शानेदीवान, मंत्रालय कक्ष अधिकारी भुजबळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पवार, सांगली जिल्हाध्यक्ष जगताप, उपाध्यक्ष सासणे, सचिव शिवाजी चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बचाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.