अर्जुनवाड्यात बडमी कोसळून मजुराचा मृत्यू

0
181

गारगोटी (प्रतिनिधी) : अर्जुनवाडा (ता.राधानगरी) येथे गु-हाळघरासाठी वापरल्या जाणाऱ्या जळाऊ चिपाड्याची बडमी कोसळून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चार मजुरांना आपला जीव वाचवण्यात यश आले. बाळू भागोजी कांबळे (वय ४०, रा. डिगस ता.राधानगरी) असे मयत मजुराचे नाव आहे.

गारगोटी-कोल्हापूर राजमार्गावर सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर अर्जुनवाडा पाटी जवळ अजित पांडुरंग पाटील (रा.अर्जुनवाडा) यांचे  गु-हाळघर आहे. सध्या गुळ उत्पादन हंगाम सुरु झाला असल्याने मजुरांकडून विविध कामे चालू आहेत. या ठिकाणी पंचवीसहून अधिक मजूर काम करतात व आपला उदरनिर्वाह चालवतात. गु-हाळघरासाठी काईलीत टाकलेला रस आटवण्यासाठी जळण म्हणून गेल्या हंगामामध्ये उसाची शिल्लक राहिलेली चिपाडे वापरली जातात.

ही चिपाडे एकावर एक रचून त्याची बडमी केली जाते व त्यातील चिपाडे गरजेप्रमाणे काढली जातात. आज ही चिपाडे काढण्याचे काम चालू असताना अचानक या बडमीचा निम्मा भाग खाली कोसळला. तीन – चार मजुरांनी बाजुला होत आपला जीव वाचवला, पण बाळू कांबळे याला बाहेर पडण्यास उसंत मिळाली नाही व तो बडमी खाली सापडला. अंगावरची बडमी सर्व मजुरांनी हटवली पण तोपर्यंत खूप उशीर झाला व कांबळे याचा दुर्देवी अंत झाला.

कांबळे यांची सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनेची नोंद राधानगरी पोलिस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार नलवडे करत आहेत.