कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या रॅलीची सुरुवात निर्माण चौकातून होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयकं मंजूर करुन घेतली. लोकशाही, संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्र सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून नुकताच १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले होते. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरू केली आहे.

रॅली गुरुवार दि. ०५ नोव्हेंबर, रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता निर्माण चौकातून सुरुवात होणार असून याची सांगता दसरा चौक येथे होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या रॅलीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला महापौर निलोफर आजरेकर ,जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील , गुलाबराव घोरपडे, उपमहापौर संजय मोहिते, सचिन चव्हाण सरलाताई पाटील ,संध्या घोटणे, चंदा बेलेकर ,संपत चव्हाण पाटील ,विक्रम जरग उपस्थित होते.