मुंबई / कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकासअंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाकरिता २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. दोन टप्प्यात हा निधी मिळणार आहे. यासाठी आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाबाबत आज (मंगळवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला.

नागपूर अधिवेशनामध्ये रस्ते विकास प्रकल्पासाठी १७८.९७ कोटींच्या निधीची मागणी केलेली होती. त्यानंतर नगरविकास खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. महापुरामुळे कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाले असून, रस्ते विकास प्रकल्पासाठी निधीस मंजूरी द्यावी, अशी मागणी आ. जाधव यांनी यावेळी केली. कोल्हापुरातील रस्त्याचे प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामुळे निधी कसा द्यायचा असा प्रश्न सचिव महेश पाठक यांनी केला. यावेळी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याची पूर्तता महापालिका एक महिन्यात करेल अशी ग्वाही आ. जाधव यांनी आणि प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी देशातून पर्यटक येतात. त्यामुळे रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी द्यावा असा आग्रह आमदार जाधव, पालकमंत्री पाटील यांनी धरला. महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महापालिकेकडून कामाची पूर्तता करून द्या, रस्ते विकास प्रकल्पासाठी २०३. ८२ कोटी रुपयांचा निधीस मंजुरी देत, दोन टप्प्यात निधी देण्यात येईल, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिका ड वर्ग समाविष्ट असल्याने यामुळे रस्ते प्रकल्पाच्या निधीतील २५ टक्के रक्कम महापालिकेस भरावी लागेल. कोरोनामुळे महापालिका आर्थिक अडचणीत असल्याने २५ ऐवजी १० टक्के निधी घ्यावा अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

या बैठकीस नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. प्रकाश आबिटकर, भूषण गगराणी (प्रधान सचिव नगरविकास-१), महेश पाठक (प्रधान सचिव नगरविकास-२), पांडुरंग जाधव (सहसचिव नगरविकास) आदी उपस्थित होते. आ. ऋतुराज पाटील, महापालिकेचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.