किणे येथील महिला सदस्याने मुख्याध्यापकाशी संगनमताने सादर केला खोटा जातदाखला…

माजी सभापती मसणू सुतार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

0
282

आजरा (प्रतिनिधी) : किणे (ता. आजरा) येथील नूतन ग्रा. पं. महिला सदस्य गुलाबी मारुती केसरकर /भालेकर यांनी सरपंचपदावर दावा करण्यासाठी मुख्याध्यापकाला हाताशी धरून जातीचा खोटा दाखला सादर केला आहे. त्यांचे सदस्यपद रद्द व्हावे आणि मुख्याध्यापक सुबराव मारुती बेळकी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी सभापती मसणू सुतार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, किणे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाबी मारुती केसरकर या प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. सरपंच पदासाठीचे आरक्षण नाम. प्र. स्त्री यासाठी राखीव झाले आहे. त्यांनी या पदावर दावा करण्यासाठी खोटा जातीचा दाखला काढणे करिता प्राथमिक शाळा हडलगे ता. गडहिंग्लज येथील शाळेचे मुख्याध्यापक सुबराव मारुती बेळकी यांना हाताशी धरले. त्यांच्याशी संगनमताने शाळा दाखला रजिस्टरमध्ये खाडाखोड करून कोष्टकी हिंदू- मराठा च्या पुढे कुणबी लिहून खोटा दाखला देऊन सदर जातीचा दाखला मिळणे कामी गडहिंग्लज येथील कार्यालयात जातीचा दाखला प्रकरण सादर केले आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे दि. ३  फेब्रुवारी रोजी सदर दाखला खोटा असल्याची तक्रार केली आहे.

मसणू सुतार यांचे सुपुत्र, माजी सरपंच जयवंत सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की सदर खोट्या दाखल याबाबतचा दिलेला प्रस्ताव हे प्रकरण आमच्या लक्षात येताच आम्ही २ फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक बेळकी यांना मी फोनवरून विचारले तसेच संबंधित कागदपत्रे मला मिळणेकामी अर्ज करणार असल्याचे सांगितले असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली. याकरता दि. ३ फेब्रुवारी रोजी सदर कागदपत्रे मागणी करता मी हडलगे येथील प्राथमिक शाळेत गेलो असता व कागदपत्रांची मागणी करणेकरिता मुख्याध्यापकांची वाट पाहात बसलो. परंतु ते त्या दिवशी ते गैरहजर राहिले व फोन केला असता फोन बंद करून घरी बसले यावरून माझी शंका अधिक बळावली. तेथून मी तातडीने गडहिंग्लज येथे संबंधित कार्यालयात येऊन मुख्याध्यापक यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य शिक्षण अधिकारी जि. प. कोल्हापूर यांच्याकडे रजिस्टर्ड पोस्टाने तक्रार दाखल केली आहे.

केसरकर यांनी  शासनाची फसवणूक केलेली असून त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पद बरखास्त व्हावे म्हणून मी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. मुख्याध्यापक बेळकी यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना कायमचे बडतर्फ करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य शिक्षण अधिकारी, जि प कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आम्ही याप्रकरणी न्यायालयात देखिल दाद मागणार आहोत, असा इशारा देण्यात आला आहे.