गगनबावडा (प्रतिनिधी) : येथील एका बँकेतील कंत्राटी कामगार आकाश सुरेश बावडेकर यांनी आपल्याला ४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत कामावर हजर करून न घेतल्यास सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

बावडेकर यांनी बँक मॅनेजर यांना २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मी २०१४ पासून कंत्राटी कर्मचारी म्हणून बँकेत कार्यरत आहे. सेवाकाळात मी माझे काम प्रामाणिकपणे, कामात कोणतीही कसूर न करता, वरिष्ठांचे सूचनांचे पालन करून केलेले आहे. २० जुलै २०२२ रोजी माझी प्रकृति बिघडल्याने रीतसर परवानगी घेऊन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी गेलो. दोन दिवसानंतर बँकेत आल्यानंतर व्यवस्थापकांनी ‘आणखी आठ दिवस विश्रांती घे.’ असे सांगितले. पुन्हा बँक मॅनेजर यांना कामावरून  हजर करून घेण्यासाठी गेलो, त्यावेळी त्यांनी ‘आणखी चार दिवसांनी कामावर ये’ असे सांगितले. तेव्हापासून आज अखेर वारंवार हेलपाटे मारत आहे; पण मला हजर करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

नोकरी गेली, माझी व कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे,  मानसिकदृष्ट्या सर्व कुटुंबाचे खच्चीकरण होत आहे. म्हणून ४ नोव्हेंबर अखेर कामावर हजर करून न घेतल्यास सहकुटुंब आत्मदहन करत आहे, असे बावडेकर यांनी बँकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बँकेचे मॅनेजर परप्रांतीय असून त्यांना मराठी नीटशी येत नाही. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांचे म्हणणे असे की, ‘तो पर्मनंट नाही. बाह्य कर्मचारी आहे. सध्या आम्हाला त्याची जरूर नाही.’ अधिक माहिती विचारता, ते फोन उचलत नसल्याने समजून येत नाही.