टोप (प्रतिनिधी) : शिरोली येथे शेतजमिनीच्या वादातून एकाला धमकावणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये पुलाची शिरोली येथील सुमारे चौदा जणांविरुद्ध शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुनील रंगराव पाटील, अनिल रंगराव पाटील, श्रेयस सुनील पाटील, आदित्य पंडित पाटील, शिवेंद्र पंडित पाटील, संभाजी गायकवाड व त्यांच्या सोबत असणारे आठ अनोळखी व्यक्ती (सर्व रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत राजेंद्र आनंदराव माने ( वय ४२, रा. मोहिते कॉलनी, प्लॉट क्र. ८, कदमवाडी, ता. करवीर,  जि. कोल्हापूर ) यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बांधकाम व्यवसायिक राजेंद्र माने यांनी कोल्हापूर-सांगली महामार्गालगत पुलाची शिरोली येथील गट क्रमांक १८२/१ मधील १०७ गुंठे शेत जमीन खरेदी केली आहे. यापैकी वीस गुंठे जमीन सुनील व अनिल पाटील या भावांनी ताकतीचा वापर करून बळकावून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याची पाहणी करण्यासाठी राजेंद्र माने हे आपल्या शेतजमिनी जवळ आले. त्यावेळी सुनील पाटील, अनिल पाटील, श्रेयस पाटील, आदित्य पाटील, शिवेंद्र पाटील, संभाजी गायकवाड व अन्य आठ अनोळखी व्यक्तींनी राजेंद्र माने यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्यावर वीळा, काठीने व सत्तूरने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगातील कपडे फाडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या व्यक्तीला आमच्या शेताजवळ शेती करू देणार नाही. तुला तुझ्या शेतात पाय ठेवू देणार नाही. पाय ठेवलासच तर तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ केली. आणि त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. शेतात असणारे शेड आणि खताची पोती पेटवून देऊन नुकसान केले. याबाबत राजेंद्र माने यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात व्हिडिओ चित्रीकरणास सह जातीवाचक शिवीगाळ केल्याचे पुरावे सादर करून आपली तक्रार दिली आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा अधिनियम व भारतीय दंड विधान संहिता कायदा कलमान्वये अनेक गुन्हे संबंधितांवर दाखल करण्यात आले आहेत.