पूरग्रस्तांचा मोर्चा काढल्याप्रकरणी शिरोळ नगराध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हा…

0
19

शिरोळ (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असूनही शिरोळ येथे मोठा जमाव करून पूरग्रस्तांचा मोर्चा काढल्याप्रकरणी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीच्या १४ जणांविरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे (रा. कुरुंदवाड), शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, डॉ. संजय पाटील, सचिव दगडू माने, विजय पवार, बाळासाहेब माळी, ॲड. सुशांत पाटील, सुरेश सासणे, विनोद पुजारी, सुनील इनामदार, आयुबखान पठाण, इक्बाल बागवान, दशरथ काळे व उमेश कर्नाळ अशी त्यांची नावे आहेत.

याबाबतची फिर्याद हे. कॉ. मदन मधाळे यांनी दिली. आम्ही लोकशाही व कायदा मानणारे आहोत. पण महापुराची आपत्ती येऊन महिना होत आला तरी पूरग्रस्त नागरिकांना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा रामचंद्र डांगे यांनी दिला,

आंदोलकांचे शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आजही सुरु राहिले. कितीही गुन्हे दाखल करा पण, आम्ही पुरग्रस्तांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा पूरग्रस्त अन्याय निवारण  समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.