गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तिरवडे गावच्या गायरान हद्दीला लागून असलेल्या जंगल क्षेत्रात आज (शनिवार) एक गवा मृतावस्थेत आढळून आला. यामुळे कडगाव वन विभागाची एकच धावपळ उडाली. परिसरातील नागरिकांनी गव्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.  

या गव्याचा मृत्यू हा कळपातील दोन नर गव्यांच्या टकरीत बेंबीखाली अवघड जागेस शिंग लागून झाला आहे. मिलनाच्या चढाओढीत झालेल्या या झुंजीत त्याला प्राण गमवावा लागला असल्याचा अंदाज कडगावचे वनक्षेत्रपाल बी. एस. पाटील यांनी व्यक्त केला. मात्र काही वन्यजीव अभ्यासकांनी यावर शंका व्यक्त करताना म्हटले की सध्याचा पावसाळ्याचा कालावधी हा मीलनाचा नाही. झुंजीत पराभव जाणवू लागल्यास गवा बाजूला होतो व कळपापासून एकाकी जीवन जगतो. झुंजीत अवघड जाग्याला शिंग लागून मरण पावणे अशक्य आहे. कड्यावरून जरी पाय घसरून पडला तरी तो मोडतो पण लवकर मरत नाही. एका रात्रीत गवा अशा तऱ्हेने मरणे नैसर्गिकदृष्ट्या शक्य नाही.

वन विभागाने मात्र हा गवा टकरीतच मरण पावल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. मुरगूडचे (ता. कागल) चे पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग १ यांनी या गव्याचे शवविच्छेदन केले. यावेळी वनरक्षक बाळासाहेब पाटील, सारिका बेडगे, जॉन्सन डिसोजा, वनमजूर शांताराम पोवार, गोपाळ चव्हाण, मारुती चौगले, चालक विजय शिंदे उपस्थित होते.