मुंबई (प्रतिनिधी) : ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक, अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही,  अशा  एकेरी शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना इशारा दिला  आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली, याचं उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल २१ जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काय बोलणार?  असे टीका भाई जगताप यांनी केली आहे.  या टीकेला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यावरून भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही सवाल उपस्थित करत निशाणा साधला आहे.