कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आघाडीची बँक आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. सोमवारी (दि.११) अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. १८ जागांसाठी १८ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. आज (बुधवारी) दुपारी ३ वाजता आजरा येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोधची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांच्या निधनानंतर होणाऱ्या बँकेच्या तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांनी सत्तारूढ आघाडीची मजबूत बांधणी केली. विरोधी गटातील तीन इच्छुकांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. १८ जागांसाठी १८ अर्ज शिल्लक राहिल्याने चराटी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले. यावेळी विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. काकडे आज  दुपारी ३ वाजता बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृकपणे जाहीर करतील.

मल्टिस्टेटचा दर्जा मिळालेल्या आजरा अर्बन बँकेच्या आजरा, कोल्हापूरसह कोकण  पुणे, मुंबई, कर्नाटकात शाखा विस्तार झाला आहे. बँकेचे आजरा तालुक्याच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे. या माध्यमांतून जनता शिक्षण संस्था आणि आण्णा भाऊ सूतगिरणीची उभाऱणी करण्यात आली आहे.

आजरा अर्बन बँकेचे हजारो सभासद आणि सहकाऱ्यांच्या पाठबळामुळेच ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. याच बळावर आम्ही बँकेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळातदेखील सर्वांच्या सहकार्याने बँक शेड्युल्ड करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 – अशोक चराटी, प्रमुख, आण्णा भाऊ संस्था समूह, आजरा