कोल्हापूर (प्रतिनिधी) : गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चार महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज (शनिवार) गुजरी कॉर्नर येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख ५० हजारांचे ११ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. पूजा अर्जुन सकट (वय ३०) अर्चना चंद्रकांत चौगुले (२१, दोघीही रा. बुद्धनगर, निपाणी, जि. बेळगाव), सुवर्णा विशाल जाधव (वय ३०) आणि मंदा सागर सकट (२८, दोघीही रा. टेंबलाई उड्डाण पूल, टाकाळा, कोल्हापूर) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

या संशयित महिलांनी एस. टी. स्टँड गारगोटी व बाळूमामा मंदिर आदमापूर येथे १४ डिसेंबर २०२० रोजी महिलांच्या पर्स तसेच गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक किरण गावडे यांना या महिला कोल्हापुरातील गुजरी कॉर्नर येथे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिथे त्यांना ताब्यात घेतले. या महिलांनी एसटी स्टँड, गारगोटी व बाळूमामा मंदिर, आदमापूर येथे दि. १४ डिसेंबर २०२० रोजी महिलांच्या पर्स तसेच गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून ११ तोळे सोन्याचे दागिने असा ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहा. पोलीस उपनिरीक्षक विजय गुरखे, हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि पथकाने केली.