कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. वॉर्डनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुक तयारीला लागले आहेत. यातूनच उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा चालू आहे. एका काँग्रेस पक्षाकडे शहरातील सर्व ८१ वॉर्डासाठी तब्बल २ हजार जणांनी उमेदवारी मागितली आहे. सद्यस्थितीत उमेदवारी अर्ज सर्वाधिक काँग्रेस पक्षाकडे मागणी केल्याचे पुढे आले आहे.

महापालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाआघाडीची सत्ता आहे. पण निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वतं!पणे लढण्याची तयारी करीत आहे. इच्छुकांची संख्या अधिक आहे, बंडखोरी होवून विरोधातील भाजपला फायदा होवू नये, यासाठी आम्ही स्वतंत्रपणे लढणार असल्याचा युक्तिवाद काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाकडून केला जात आहे.

दरम्यान, वार्डनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारी मागण्यासाठी नेते आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी मागणीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे रीघ लागत आहे. आतापर्यंत काँग्रेसकडे सर्व

वार्डातून दोन हजार जणांनी उमदेवारी अर्ज मागितल्याचे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वशिला लावला जात आहे. पण राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अजून बाहेर पडलेली नाही. शहरात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे पालकमंत्री पद आहे. म्हणून काँग्रेसकडून लढल्यास निवडून येणे शक्य होईल, असे वाटत असल्याने या पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणाऱ्यांची सर्वाधिक संख्या असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.