इचलकरंजी (प्रतिनिधी) : विकासकामे न करता नुसती आश्वासन देऊन बोळवण करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध कऱण्यात आला. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर जाहीर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचा फलक यड्राव येथील कुंभोजे मळा (प्रभाग क्र.६)  येथे नागरिकांनी लावला.  

येथील नागरिकांनी डिजिटल फलक लावून मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या प्रभागात १०६ मतदार आहेत. त्यांनी मतदान न केल्यास मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा फटका उमेदवारांना बसू शकतो. गेली अनेक वर्षे या भागातील रस्ते व गटारीच्या समस्या प्रलंबित आहेत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीवेळी कामे करण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु निवडणुकीनंतर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रस्ते व गटारी करण्याचे आश्वासन न देता लेखी लिहून देण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी लक्ष घालून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. आता यावर लोकप्रतिनिधी कोणता तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.