कागल (प्रतिनिधी) : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे देण्यात येणारा ‘उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन’साठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. कारखान्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासासाठीचा हा नववा तर एकूण ६२ वा पुरस्कार आहे. यामुळे कारखाना दक्षिण विभागात पुन्हा नंबर १ ठरला आहे.  

गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे राबवलेल्या ऊस विकास योजना व त्याची काटेकोरपणे केलेली अंमलबजावणीची दखल घेऊन हा पुरस्कार दिला आहे. संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या कल्पक व दूरदृष्टी नेतृत्वाखाली कारखान्यास पंचावन्न पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या निधनानंतर विद्यमान चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुरस्काराची परंपरा अखंडित राहिली असून त्यांच्या कारकिर्दीतील हा सातवा पुरस्कार आहे.

याबाबत चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले की, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी बदलत्या परिस्थितीत कारखाना सक्षमपणे कसा चालवावा याबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्याप्रमाणेच कारखाना व्यवस्थापनाची व प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. त्याचेच हे यश आहे. साखर कारखानदारीत सर्वच आघाड्यांवर आदर्श जपण्यात सभासद ऊस उत्पादक कामगार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे.

या पुरस्काराबद्दल कारखान्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.