कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे राजकीय हालचालींना गती आली आहे. बावडा परिसरात या वेळीही पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक या दोन पारंपरिक विरोधी गटात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. पालकमंत्री पाटील यांना कसबा बावडा या बालेकिल्ल्यातच हादरा देण्यासाठी महाडिक आणि ताराराणी आघाडीकडून तुल्यबळ उमेदवारांची निवड केली जात आहे.

वास्तविक, बावड्यात एकूण सहा प्रभाग येतात. पालकमंत्री पाटील यांचे वास्तव्य बावड्यात असल्याने या सर्व प्रभागात त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. त्याला हादरा देण्यासाठी महाडिक गटाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेच्या प्रभागाची सुरुवात बावड्यातून होते. शुगरमिल हा क्रमांक एकचा प्रभाग आहे. शुगरमिल प्रभागातच राजराम साखर कारखाना आहे. या कारखान्यावरून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकारण चालते. म्हणून या वेळीही महाडिक कारखान्यावर बसून बावड्यात राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत.

या परिसरातील प्रभागात पाटील गटाकडून जया उलपे, भारती उलपे, स्नेहिता उलपे तर महाडिक गटाकडून राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांच्या सून प्रज्ञा उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या पत्नी प्रियंका उलपे, प्रल्हाद उलपे यांच्या पत्नी अनिता उलपे इच्छुक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचेही उमेदवार रिंगणात असतील. पण लढत पाटील आणि महाडिक गटातील उमेदवारांमध्येच होणार आहे. गत निवडणुकीत प्रचंड चुरशीने लढत होऊनही पाटील यांचेच सर्व नगरसेवक निवडून आले. विरोधी महाडिक आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. पण सध्या दोन्ही बाजूंकडून सावध पवित्रा घेतला असून काळजीपूर्वक उमेदवार निवडले जात आहेत.

दोन्हींकडून तुल्यबळ उमेदवार असल्याने ईर्ष्येने लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री पाटील यांना बावड्यातच अडकवून ठेवण्याचा विरोधकांचा प्लॅन असल्याचे दिसून येत आहे.