मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्या शिवसेनेत सोमवारी (दि.३०) प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होते. आता या चर्चेला दुजोरा मिळणारे वृत्त समोर आले आहे.

विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या वर्षभर राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. आता त्या पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करून सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.