कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील गवशी-सावतवाडी (ता.राधानगरी) येथील धरणावर शेतकऱ्यांकडून घालण्यात येणाऱ्या मातीच्या भरावामुळे परिसरातील शेतात पाणी तुंबून मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे भराव घालणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रावत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धामणी खोऱ्यातील ४० ते ४५ गावांना वरदान ठरणारा धामणी प्रकल्प अपूर्ण आहे. त्यामुळे गेली वीस वर्षे बावेली ते आंबर्डे पर्यंत पाटबंधारेच्या सहा बंधाऱ्यावर भागातील सर्व मोठे शेतकरी एकत्र येऊन  लोकवर्गणी काढून मातीचा भराव टाकून अपेक्षेपेक्षा जास्त पाणी अडवतात. हे  पाणी मे महिन्यापर्यंत नियोजन करुन पुरविले जाते. परंतु पाणी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात साठवल्याने धरणांकाठी असणाऱ्या शेतीचे मोठे नुकसान होते. तसेच या भरावामुळे पावसाळ्यामध्ये नदीला लवकर पूर येतो. यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे काही शेतकरी तोट्यात तर काही फायद्यात असतात. पण ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही.

या धरणांचे पाणी अडवण्यासाठी लागणाऱ्या मातीचे उत्खनन बेकायदेशीर होत असते. कोणत्याही प्रकारचा कर वा रॉयल्टी या शेतकऱ्यांकडून भरला जात नाही. तसेच यामुळे पावसाळ्यात नदीकाठी बंधारे फुटून पूरस्थिती निर्माण होण्यास मदत होते. जर बंधारे घालायचेच असतील, तर त्यासाठी मर्यादा ठेवावी व पाणी अडवावे. त्यामुळे होणाऱ्या या गैरकारभाराकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन सदर व्यक्तींवर व वाहनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.