कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामासह घरफाळा घोटाळा,  खड्डेमय रस्ते, रखडलेली थेट पाईपलाईन योजना, बंद पडत चाललेल्या शाळा,  बेशिस्त दवाखाने,  ढपलेबाज कारभार,  गलिच्छ मूताऱ्या यासह विभागवार कामांचे ऑडीट व्हावे,  या प्रमुख मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेवर आज (सोमवार) पंचनामा मोर्चा काढण्यात आला.  याप्रसंगी  येत्या पंधरा दिवसांत प्रामाणिक ऑडिटर न नेमल्यास त्याचे गंभीर परिणाम महापालिकेसह प्रशासकास भोगावे लागतील, असा इशारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.

 

हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकातून सीपीआर मार्गे महापालिकेवर धडकला. यावेळी  ‘हिशोब द्या, हिशोब द्या’ – पाच वर्षाच्या कारभाराचा हिशोब द्या’,  ‘आम आदमी पार्टीचा विजय असो’, अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून सोडला. तर महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.  त्यानंतर मागण्यांचे निवेदन सहा. आयुक्त विनायक औंधकर यांना देण्यात आले.

या मोर्चात जिल्हा अध्यक्ष निलेश रेडेकर,  युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटनमंत्री सुरज सुर्वे, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, युवा शहर अध्यक्ष मोईन मोकाशी यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.