पुणे (प्रतिनिधी) : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील नेट, सेट, पीएचडी धारकांनी मतदानाविरोधात एल्गार पुकारला आहे. या निवडणुकीत सर्व प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता थेट नोटाला मतदान करणार असल्याचे नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने जाहीर केले आहे.

मागील दहा वर्षांत पदवीधर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यात पदवीधर आणि शिक्षकांचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा कोणताही पर्याय न निवडता आम्ही नोटा हा पर्याय स्वीकारणार असल्याचे नेट, सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश देवढे यांनी स्पष्ट केले. या भूमिकेबद्दलचे पत्र थेट निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी मतदारसंघात नोटाला उच्चांकी मतदान झालं तर निवडणूकचं रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयुक्तांनी केली आहे.