टोप (प्रतिनिधी) : मौजेवडगांव ग्रामपंचायत आणि गेल इंडिया यांच्यात झालेल्या करारानुसार गावठाण ते पाझर तलावापर्यंतच्या रस्त्यासाठी गेल इंडिया कंपनीने ३ कोटी १७ लाखांची निधी दिला आहे. त्यापैकी १ कोटी २० लाख रुपये कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे एक वर्षापूर्वी वर्ग केले आहेत. परंतु या रस्त्याच्या कामात काही लोकप्रतिनिधीनी खोडा घातल्याने हे काम अद्याप सुरू झालेले नाही. तरी १८ नोव्हेंबरपर्यत काम सुरु न झाल्यास १९ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू. आणि त्यानंतरही कार्यवाही न झाल्यास २३ नोव्हेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच काशिनाथ कांबळे यांनी दिला आहे.

हातकणंगले तालुक्यातील मौजेवडगांव इथल्या गायरान जमिनीतील ६८ गुंठे जमीन दाभोळ ते बेंगलोर गॅस पाईपलाईनचे काम करणाऱ्या गेल इंडिया कंपनीला दिली होती. यावेळी मौजेवडगांव ग्रामपंचायत, गेल इंडिया कंपनी आणि जिल्हा परिषद यांच्यात ञिपक्षीय करार होवुन गेल कंपनीच्या सीएसआर फंडातून सबस्टेशनकडे जाणारा ३ किलोमीटरचा रस्ता करुन देण्याचे मान्य केले होते.

या रस्त्यासाठी सव्वाशे शेतकऱ्यांनी विनामोबदला आपली जमीन दिली आहे. एक वर्षापूर्वी या रस्त्यासाठी ३ कोटी १७ लाखांपैकी १ कोटी २० लाख  जिल्हा परिषदेकडे वर्ग केले आहे. परंतु इतका मोठा निधी आल्याचे समजताच काही लोकप्रतिनिधीच्या तोंडाला पाणी सुटले. आपलाच ठेकेदार नेमण्यासाठी राजकीय वजन वापरून त्यात अडथळे निर्माण केले. दोन वेळा टेंडर प्रक्रिया होऊन पात्र ठेकेदार न मिळाल्याने प्रक्रिया रखडली आहे. या रस्त्याच्या आसपास ७०० एकर शेती असून ५०० एकरात ऊस शेती आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ होणे आवश्यक असताना काही स्वार्थ शोधणाऱ्या लोकांमुळे हे काम रेंगाळत आहे. तरी हा रस्ता न झाल्यास २३ नोव्हेंबररोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा  इशारा सरपंच काशिनाथ कांबळे, माजी उपसरपंच किरण चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र कांबरे, विजय मगदूम, विनोद चौगुले यांनी दिला आहे. यावेळी सुभाष चौगुले, नितीन घोरपडे, संतोष लोंढे, सिंकदर हजारी, धनाजी लोंढे, हसन बारगीर आदी उपस्थित होते.