मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र, आपण काळजी घेणे गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणण्यापेक्षा आपणच त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर नियमावली तयार करून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन दिली.

ते म्हणाले, मंदिरे कधी उघडणार? प्रार्थनास्थळे  कधी उघडणार अशी विचारणा होत आहे. यावरून टीकाही केली जात आहे. पण  जनतेच्या हितासाठीच मंदिरे, प्रार्थना स्थळे बंद ठेवली आहेत. आता हळू हळू सर्व पूर्वपदावर आणत आहे. मंदिरे सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरे उघडणार आहे.

आपण जिद्दीने कोरोनाचा आलेख खाली आणला आहे. आपल्याकडे मुंबईत हजाराचा आकडा शेकड्यात आला आहे. राज्यातही नियंत्रणात आहे. पण दिल्लीत किंवा अन्य ठिकाणी आकडा वाढत चालला आहे. पाश्चिमात्य देशात देखील, कोरोना पुन्हा वाढतो आहे. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवून वावर करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे.