नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कोरोना विषाणू संपण्याची शक्यता कमी आहे.     भारताची लोकसंख्या जास्त असल्याने इतर आजारांवरील लशींप्रमाणेच कोरोनाची लस सहज उपलब्ध होण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचण्यासाठी एक वर्षांपेक्षा अधिक काळ लागेल, असे दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. गुलेरिया बोलत होते. ते म्हणाले की,  लशींच्या वितरणाला आमची प्राथमिकता असेल, कारण देशातील सर्वच भागात लस पोहोचायला हवी. कोल्ड चेन सांभाळून पुरेशा प्रमाणात इंजेक्शनही देशातील सर्वच भागात पोहोचवणे आमच्यासमोर महत्त्वाचे आव्हान आहे. पहिल्या टप्प्यातील लशींनंतर दुसऱ्या टप्प्यात येणारी लस अधिक प्रभावी असेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लशीचे काय करायचे? त्यानंतर आम्हाला ठरवावे लागणार आहे की, कुणाला पहिल्या टप्प्यातील लस द्यायची आणि कुणाला दुसऱ्या टप्प्यातील लस द्यायची. खूप सारे निर्णय एकाच वेळी घेण्याची गरज असेल, असेही गुलेरिया म्हणाले.