कोल्हापूर (प्रतिनिधी) : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महापालिका, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने ताब्यात घेतली जात आहेत. नव्याने विकासकामांचा शुभारंभ करण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका महानगरपालिकेस बसणार आहे.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. आचारसंहिता लागू झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करून घ्यावेत, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती, महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, वेगवेगळ्या समित्यांच्या सभापतीकडील सरकारी वाहने जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे एक महिना पदाधिकाऱ्यांना स्वत:चे वाहन घेऊन फिरावे लागणार आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांना सरकारी यंत्रणेचा वापरही करता येणार नाही.