कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने यांना द्या, अशी मागणी प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील बैठकीत केली. जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

युवराज पाटील यावेळी म्हणाले की, भय्या माने समाजकारण आणि शैक्षणिक कार्याचा वारसा सक्षमपणे पुढे चालवित आहेत. मागील ४० वर्षांपासून पक्षीय संघटनेसह सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या  विचारधारेने काम करणारे भैय्या माने हे हाडाचे कार्यकर्ते आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रा. मधुकर पाटील म्हणाले की, विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून माने यांचा कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्याशी संपर्क आहे. त्यांच्या रूपाने एका कार्यकर्त्याला संधी दिल्यासारखे होईल.

या वेळी जि. प. सदस्य मनोज फराकटे, कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी महापौर ॲड. सौ. सूरमंजिरी लाटकर, दलितमित्र प्रा. डी.डी. चौगुले, माजी जि. प. सदस्य वसंतराव धुरे व काशिनाथ तेली, केडीसीसीचे संचालक असिफ फरास, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर व संतोष पाटील, किरण कदम, वसंतराव यमगेकर, प्रदेश राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस आदिल फरास, कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांचेसह जिल्ह्यातील इतर तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

जिल्ह्याची नोंदणी ९० हजारांवर…

पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान संख्या ही सर्वात जास्त म्हणजेच ९० हजारावर आहे. कोल्हापूरचा उमेदवार असल्यावर कोल्हापूरकर त्यांना भरभरून मते देतात, हा इतिहास आहे.