कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे. पुणे मतदारसंघातील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवार ५ रोजी राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.  

ना. पाटील म्हणाले की, राज्यात सत्तेत एकत्रित असलेल्या महाविकास आघाडीच्यावतीने विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील राज्यातील सर्व जागा एकत्रित लढविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जागा वाटपाची चर्चा सुरु आहेत. काँग्रेसच्या वाट्याला कोणती जागा येणार हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही अचानकपणे निवडणूक जाहीर झाल्याने ऐनवेळी गोंधळ नको, यासाठी तातडीने मुलाखती घेण्यात येत आहेत. वरिष्ठ पातळीवर जागांचे वाटप निर्णय झाल्यानंतर पुढील धोरण ठरेल असे पाटील यांनी सांगितले.

दादांचे टायमिंग चुकले…

ना. पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आ. चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाण्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, निवडणूक लढविण्याची ही वेळ नाही. त्यांचे टायमिंग चुकले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता. पुण्यात भाजपामध्ये सुरू असलेल्या राजकीय समीकरणातून देखील त्यांनी हे वक्तव्य केले असेल. आता कोल्हापुरातून निवडणूक लढवायची जरी म्हटले तरी त्यांचा एकही आमदार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी राजीनामा कोण देणार असा प्रश्न आहेच, असा टोलाही लगावला.