मुंबई (प्रतिनिधी) : युरोपियन देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. मागणी कमी होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली  आहे. त्याचबरोबर  कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्याने  ब्रेंट क्रूड ४ प्रति बॅरल पातळीवर घसरून ३७ डॉलरवर आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ३७  डॉलर आहे. एका बॅरलमध्ये १५९ लिटर तेल असते. सध्या एका डॉलरची किंमत ७४ रुपये आहे. म्हणजेच एका बॅरलची किंमत २७३३ रुपये आहे. तर, एक लीटरमध्ये त्याची किंमत १७.१८  रुपयांच्या जवळ येते. देशात पाण्याच्या बाटलीची किंमत २०  रुपयांच्या आसपास आहे.

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी युरोपमधील देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केला आहे. परिणामी   अर्थचक्र पुन्हा  ठप्प झाले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी आणि वापर कमी झाला आहे. दरम्यान, भारत ८३ टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो.  त्यासाठी दरवर्षी  भारताला १०० अब्ज डॉलर्स मोजावे लागतात.  कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.