हुपरी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील ‘एका’ हॉस्पिटलच्या डॉक्टरने वृद्ध महिला रुग्णाच्या बिलापोटी तिच्या कर्नाटकातील बँकेतील खात्यातील तब्बल दोन लाख रुपये परस्पर ऑनलाइनने काढून घेतले. यानंतर हतबल महिलेने हुपरी पोलिसांत धाव घेताच डॉक्टरची पाचावर धारण बसली. मग त्याने काही रक्कम या महिलेला परत देऊन प्रकरण ‘शांत’ करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून सर्वसामान्य रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हुपरीतील एका डॉक्टरने खासगी कोविड उपचार सेंटर चालू केले होते, परंतु रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे हे सेंटर बंद झाले. त्यामुळे डॉक्टर महाशयांनी नॉन-कोविड रुग्णांवर उपचार सुरु केले. कर्नाटकातील मांजरी येथील एक वृद्ध महिला हुपरीतील नातेवाईकांकडे आली असता तिला त्रास झाल्याने ‘या’ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या वेळी नातेवाइकांनी तत्काळ ३० हजार रुपये भरले. काही दिवसांनंतर उपचार केल्यानंतर बाकीच्या बिलासाठी डॉक्टर व हॉस्पिटल व्यवस्थापकाने तगादा लावला. यानंतर डॉक्टर व व्यवस्थापकाने त्या महिलेच्या मांजरी येथील बँकेत संपर्क साधून ऑनलाइनने टप्प्याटप्याने तब्बल दोन लाख रुपये काढून घेतले.

तिच्या नातेवाईकांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात गाठून निरीक्षक राजेंद्र मस्के यांना सांगितली. त्यांनी संबंधित डॉक्टरांची चांगलीच कानउघाडणी केली. यानंतर डॉक्टरने काही रक्कम महिलेला परत देऊन दिली. सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी संबंधीत महिलेच्या नातेवाईकांना साकडे घातले. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून गोरगरिबांना लुटणाऱ्या अशा डॉक्टरवर कारवाई करण्याची होत आहे.