टोप (प्रतिनिधी) : शिरोली गावातील रहिवासी अतिक्रमणे कायम करण्यासाठी संबंधित गट नंबरची शासकीय मोजणी तात्काळ करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करावे, अशी सुचना प्रांताधिकारी विकास खरात यांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना दिली.  येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी छञपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते. तर तहसीलदार प्रदिप उबाळे यांची  प्रमुख उपस्थिती होती.

शिरोली गावातील गेल्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेली रहिवासी अतिक्रमणे कायम करण्यासाठी संबंधित गट नंबरची तपासणी करून तातडीने पावले उचला, असा आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी संबंधित विभागास दिला होता. पण गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही बैठक लांबणीवर पडली होती. प्रांताधिकारी खरात आणि तहसीलदार उबाळे यांनी शिरोली गावातील रहिवासी अतिक्रमणे कायम करण्यासाठी ग्रामपंचायत भूमी अभिलेख, मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, ग्राम विकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांची बैठक शिरोली ग्रामपंचायत मध्ये बुधवारी घेऊन आदेश दिले.

गावातील गट नंबर ६००, ६०२, ६०६ या गट नंबरचे नकाशे घेऊन रितसर मोजणी करून मुळ सनदधारक किती, विना सनदधारक किती, ओपन स्पेस किती यांचे नोंदणी करावी. तसेच शासकीय मोजणी करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करावे, याची माहिती संबंधित लोकांना आणि ग्रामपंचायतीला द्यावी. अशा सुचना प्रांताधिकारी यानी दिल्या.

यावेळी सरपंच शशिकांत खवरे यांनी शिरोली गावातील रेणुकानगर, मकाजी मळा, विलासनगर, पाण्याची टाकी, बाळूमामा धनगर वसाहत, वाढीव गायरान येथील ६००,६०२,६०६ या गट नंबर मध्ये गेल्या तीस वर्षापासून रहिवासी अतिक्रमणे आहेत. लोक रहायला आहेत. रेणुकानगर येथील लक्ष्मण रोहिदास याचे अतिक्रमण मधील घराचे ऑनलाईन सात बाराला नोंद झाली आहे. अशाच पद्धतीने उर्वरीत लोकांची ही अतिक्रमणे कायम करावीत अशी मागणी केली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी शिरोलीत सुमारे १२६४ अतिक्रमणे ग्रामपंचायतीकडे नोंद आहेत अशी माहिती दिली.

या बैठकीस उत्तम पाटील, ग्रामविकास अधिकारी ए. एस.कठारे, मंडल अधिकारी बी. एल. जाधव, तलाठी निलेश चौगुले आदी उपस्थित होते.