मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. पण प्रश्न सोडविण्याबाबत निर्णय घेण्याची कमतरता सरकारकडे आहे. आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?, असा सवाल करत सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सरकारचे वाभाडे काढले. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

 

राज ठाकरे यांनी वाढील वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वीज बिल कमी करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश अडकले आहेत, रेल्वे सुरू होत नाहीत, महिलांचे प्रश्न आहेत, कशासाठी सरकार कुंथतंय हे समजत नाही. कुंथत कुंथत सरकार चालत नाही. रस्त्यात वाहतुककोंडी आहे. रेस्तराँ सुरू झाली आहेत, पण मंदिरे उघडली नाहीत, धरसोडपणा काय सुरू आहे, हे समजत नाही. सरकारने नीट विचार करून लोकांना एकदाच काय ते स्पष्ट करावे, सेही राज ठाकरे म्हणाले.