मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते वाढीव वीज बिलांविरोधाच आंदोलन करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (गुरूवार) भेट घेतली, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलत सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितले. पण अजून तो होत नाही. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी एकदा शरद पवारांशी बोलून घ्या सांगितले. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटते हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. लोकांना जिथे २००० बिल येत होते. तिथे १० हजार बिल येत आहे. राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण कशात अडकले आहे कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. राज्यपालांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.