रायगड (प्रतिनिधी) : दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जिव्हारी लागलेल्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. यावर शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर देताना बीपी, शुगर वाढली की, काय आणि कसं बोलतात हे नारायण राणेंनाच कळत नाही, अशा शब्दांत  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राणेंना टोला लगावला आहे.

सत्तार म्हणाले की, हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कांगावा करून भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करीत आहे.  भाजप नेत्या पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या वारस आहेत. त्या सेनेत आल्यास त्यांचे स्वागतच होईल. शिवसेनेशी केलेल्या गद्दारीचे भोग आगामी निवडणुकांमध्ये भाजपला भोगावे लागतील, असेही सत्तार म्हणाले

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान न करता भाजपने गद्दारीच केली आहे. याची जाहीरपणे कबुली भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच दिली आहे. याबाबत दानवेंच्या भाषणाची व्हिडीओ क्लिपच  सत्तारांनी पत्रकारांना दाखवली.