कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली आहे. त्यांना ही भाषा शोभत नाही. केवळ भाजपवर टीका करण्यासाठी भाषणाला उभा राहिले होते असं वाटत होतं. बेताल टीका कराल तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देत त्यांचे भाषण हे दसरा मेळाव्यातील नसून शिमग्यातील वाटत होतं, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते आज (मंगळवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. ती भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा राखली नाही. जनतेशी संबंधित एक देखील मुद्दा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडला नाही. शेण, गोमूत्र यांचा उल्लेख करत आमच्या नेत्यांवर टीका केली. त्यामुळं इतरांकडून सभ्य भाषेत बोलण्याची इच्छा का व्यक्त करताय ? हम किसीं को टोकेंगे नहीं… हमे टोकेंगे तो हम छोडेंगे नही, असे सांगत आमच्यावर बेताल टीका कराल तर तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणावरुन चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसून साधं कोर्टात यांना वेळेवर पोहोचता येत नाही का ? सरकारनं स्थगितीनंतर केलेले प्रयत्न हे संशयास्पद आहेत. यांनी कधीही वकिलांशी चर्चा केली नाही. विरोधी पक्षाला चर्चेमध्ये सहभागी करुन घेतलं नाही. मुळात स्थगिती मिळू नये म्हणून या सरकारने जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते केले नाहीत. केवळ मराठा समाजालाच हे सरकार वेठीस धरत नसून संपूर्ण महाराष्ट्राला हे सरकार वेठीस धरत आहे.