नागपूर ( प्रतिनिधी) : पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

२४ मार्च २०१२ रोजी ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी यांना मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला. या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर निर्णय घेताना उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. कोर्टाने पोलिसांना नोटीस बजावली आहे.