कोल्हापूर (प्रतिनिधी) : चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करता येऊ शकते. कलम ३७० आणि ३५ ए पुन्हा लागू करण्यासाठी आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी शांततेने लढा देईन, असे म्हणणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. याबाबतचे निवेदन आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, हे वक्तव्य देशाच्या विरोधात असून शत्रूराष्ट्र असलेल्या चीनचे समर्थन करणारे आणि गलवान खोर्‍यात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या हौतात्म्याचा अवमानच आहे. त्यामुळे देशविरोधी वक्तव्य करणार्‍या अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी.

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, अखिल भारतीय हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे उपस्थित होते.