टोप (प्रतिनिधी) :  शिये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) चुरशीने ८८.२९ मतदान झाले. मतदान शांततेत झाले असून सत्ताधारी जयभवानी आघाडी की विरोधी जय हनुमान आघाडी शियेचा गड राखणार हाच चर्चेचा विषय झाला आहे.

गावातील सत्ताधारी जयभवानी विकास आघाडी विरोधात जय हनुमान ग्रामविकास आघाडीने शड्डू ठोकला होता. यामुळे गावात चांगलीच चुरस पहावयास मिळत होती. तर काही अपक्ष उमेदवारांनीही या निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. गावात एकुण ६,३४६ मतदान असुन त्यापैकी ५,६०३ इतके मतदान झाले आहेत. यामध्ये ६ प्रभाग असून सर्वात जास्त वार्ड क्रमांक एक मध्ये जास्त चुरस पहायवयास मिळत आहे.

आज गावातील सर्व उमेदवाराचे नशीब आता मशीन मध्ये बंद झाले आहे. यामुळे चुरशीने झालेल्या या मतदानामुळे मतदार नक्की कोणाच्या पारड्यात विजय टाकणार याचीच जोरदार चर्चा सध्या गावात सुरु आहे. गावात यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणुन मतदान केंद्रावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.