पन्हाळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान…  

0
155

पन्हाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी १५६ केंद्रांवर आज (शुक्रवार) चुरशीने पण शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी ८२ टक्के मतदान झाले आहे. तालुक्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोडोली ग्रामपंचायतीसाठी केवळ ६६ तर कळे ग्रामपंचायतीसाठी ८९ टक्के मतदान झाले. 

ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीचा कौल सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचा असेल. मतमोजणी सोमवारी होईल. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही.

आज तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी १५६ मतदान केंद्रांवर ३८२ उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले. आता सर्वांनाच १८ रोजी होणाऱ्या मतमोजणीतून काय निकाल लागतो याची प्रतीक्षा लागली आहे.