गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळवाजुळवीच्या राजकारणामुळे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील तहसील कार्यालयात तोबा गर्दी झाली. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी महिलादेखील मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. गगनबावडा तालुक्यात सरपंचपदासाठी एकूण ८१, तर सदस्यपदासाठी ३०० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तालुक्यात दोन्ही मिळून ३८१ अर्ज दाखल झाले आहेत.

गगनबावडा तालुक्यातील असळज, कोदे बुद्रुक, वेसर्डे या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या गावांची सरपंच निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यातील कोदे बुद्रुक, मार्गेवाडी व साळवण या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या जागाएवढेच अर्ज दाखल झाल्याने येथील सदस्यपदाच्या निवडी बिनविरोध होणार आहेत. कोदे बुद्रुक या एकमेव ग्रामपंचायतीच्या सदस्य व सरपंच निवडी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोदे बुद्रुक, असळज येथे बिनविरोध निवडले जाणारे सरपंच हे आमदार सतेज पाटील गटाचे आहेत.