कोल्हापूर (प्रतिनिधी) : भ्रष्टाचार कुठे नाही ? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कठीण आहे. पवित्र मानलेल्या शिक्षण क्षेत्रातही तो आहे. पण, तो जरा जास्तच असल्याचे दिसते. आपली नोकरी कायम व्हावी म्हणून थोडा थोडका नव्हे तर, तब्बल ८० लाखाचा सौदा केल्याची कुजबुज सध्या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यात सुरू आहे.

अगदी एका बाजूला, सीमेलगत असलेल्या दुर्गम, डोंगराळ भागात असलेल्या या तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत अलीकडेच चार माध्यमिक शिक्षकांना सेवेत कायम करण्यात आले. अर्थात ते काही सरळ मार्गाने झालेले नाही. त्यासाठी सौदेबाजी झाली. तीही कोटीच्या आसपास.

या सगळ्या सौदेबाजीत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य भूमिका बजावल्याची चर्चा आहे. गुणवत्तेच्या आधारे ही प्रक्रिया पार पडली असती तर, कुजबुज व्हायची शक्यता नव्हती. पण, आप्तस्वकीयांना, धनदांडग्याना, वशिलावाल्यांना सामावून घेण्यासाठी सौदेबाजीचा मार्ग अवलंबला. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागात आशेचा किरणदिसला. लोहागरम आहे तोपर्यंत ८० लाखाचा ठोका टाकून हेतू साध्य करून घेतला. या सौदयाची पाळेमुळे पार पुण्यनगरी पर्यंत पोहचली आहेत.

चारपैकी एकजण संस्था चालकांशी संबंधित, एक नातेवाईक, एक पैसेवाला आणि एक वशील्याचा असल्याची चर्चा आहे. अशा दुर्गम भागात अशी सौदेबाजी चालते हे पटत नाही. पण, सत्य कटू असते हेच खरे. कधीकाळी स्वच्छ प्रतिमा असलेल्या या संस्थेत असले धंदे चालतात हे बघून तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर सौदेबाजी करून गुणवत्तेला फाट्यावर मारून शिक्षण संस्था चालणार असतील तर, प्रामाणिक नागरिक तयार कसे होणार ? सौदेबाजीवर निवडलेले हे शिक्षक काय शिकवणार ? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या संबंधी तक्रार कोणी करण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या सौदेबाजी करणाऱ्यांची सखोल चौकशी करून संबंधीत नियुक्त्याच रद्द कराव्यात, अशी प्रामाणिक जनतेची मागणी आहे.