जिल्ह्यात ॲट्रॉसिटीखाली ८० गुन्हे दाखल

0
133

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्हयात जानेवारी ते नोव्हेंबर अखेर ८० ॲट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल झाले आहेत. यातील २९ गुन्हे प्रलंबित आहेत, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे दिली.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तपासावरील प्रलंबित ॲट्रॉसिटी प्रकरणे पोलिसांनी तात्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना दिल्या. ते म्हणाले, उच्च न्यायालयातील ॲट्रॉसिटी प्रलंबित प्रकरणे वगळता प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलीस विभागाने लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल. पोलीस अधीक्षकांनी पीसीआरला पत्रव्यवहार करून प्रलंबित प्रकरणांबाबत पाठपुरावा करावा.  बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, डॉ. हर्षदा वेदक, अशासकीय सदस्य निरंजन कदम, राजू मालेकर, जिल्हा विधी व सेवाचे सहायक अधीक्षक रा.गो. माने आदी उपस्थित होते.